पुणे : पुणे–सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज या दरम्यान वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक स्पीड कॅमेरे गॅन्ट्री बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी येत्या ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) कार्यालयाच्या प्रकल्प संचालकांनी दिली आहे.

महामार्गावरील वाढती वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेता स्पीड नियंत्रण कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचा वेग स्वयंचलित पद्धतीने नोंदविला जाणार असून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन महामार्गावरील सुरक्षितता वाढण्याची अपेक्षा आहे.

कामाच्या कालावधीत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साताराकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी या वेळेत कात्रज जुना बोगदा तसेच सेवा रस्त्यांचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी या मार्गांवर तैनात राहणार असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, सकाळच्या वेळेत कार्यालयीन आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, शक्य असल्यास पर्यायी वेळ किंवा मार्ग निवडावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊन पुढील काळात महामार्ग अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहील, असा विश्वास प्रकल्प संचालकांनी व्यक्त केला आहे.