पुणे : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर टिळेकरवाडी गावात २४ ते ३० जानेवारी या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराचा समारोप सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाला.

समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बी . व्ही. राव कुक्कुटपालन व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था (IPMT) येथील डॉ. संजय सुरडकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे, टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर, उपसरपंच सौ. कल्पनाताई टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य नंदाताई राऊत, माजी सदस्य संगीता टिळेकर, श्री दत्तसेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, पोलिस पाटील विजय टिळेकर, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अक्षय टिळेकर, माजी सरपंच सौ. नीता टिळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. संजय सुरडकर म्हणाले की, टिळेकरवाडी येथील बी. व्ही. राव कुक्कुटपालन व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्थेने पडिक जमीन वापराखाली आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. संस्थेमार्फत तरुणांना कुक्कुटपालन व्यवसायाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. आजअखेर देश-विदेशातील हजारो युवक या संस्थेतून प्रशिक्षित झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात राजेंद्र टिळेकर म्हणाले की, महानुभाव पंथाचे संस्कार असलेले हे गाव शिस्त व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारे आहे. शिस्त व वेळेचे महत्त्व पाळणारा समाज निश्चितच प्रगती करतो. स्वयंसेवकांनी गावात राहून शिस्तबद्ध वर्तणुकीने विकासाला हातभार लावला, असे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी शिबिर म्हणजे समाजसेवा, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा प्रत्यक्ष अनुभव असल्याचे सांगितले. समाजाशी नाते जोडणारी ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिशादर्शक ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिबिरकाळात स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, सर्वेक्षण तसेच सामाजिक प्रबोधनपर उपक्रम राबविले, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. भाऊसाहेब तोरवे यांनी अहवाल वाचनात दिली. तसेच टिळेकरवाडीतील पडिक जमीन व्यवस्थापन करणाऱ्या ‘बाइफ’ संस्थेच्या ब्रिक (बाइफ रिसर्च इनोव्हेशन सेंटर) येथे भेट देऊन माळरान जमीन लागवडीखाली आणणे, सोलर प्लांटच्या साह्याने शेती करणे आदी प्रयोग स्वयंसेवकांनी पाहिले.

शिबिर काळात गावठाण परिसरात पेरू, चिंच, जांभूळ, कडूनिंब, रेनट्री आदी एकूण ७०० झाडांची लागवड करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने या झाडांना ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली.

शिबिरातील स्वयंसेवक पल्लवी जाधव, मालन कुरेशी, रोहन पात्रे व प्रतीक्षा ढावारे यांनी मनोगतातून अनुभव कथन केले. श्रमदानाचे महत्त्व, ग्रामस्थांशी संवाद आणि सामाजिक जाणीव यामुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने श्री दत्तसेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांनी स्वयंसेवकांच्या शिस्तीचे व योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. शिबिरकाळात स्वयंपाकाची जबाबदारी विद्यार्थी भाग्यवंत मुळजे याने शेफ म्हणून आपल्या गटाच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवा, त्याग व राष्ट्रनिर्मितीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रणिता फडके यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. हर्षल भोसले यांनी केले तर आभार प्रा. गौरव टिळेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *