पुणे : ।। मन चंगा तो कटोती मे गंगा ।। या अमूल्य संदेशाने समाजाला दिशा देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन येथे शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव श्रीराम मंदिर, उरुळी कांचन येथे श्रद्धा, भक्ती व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात संपन्न होणार आहे.
श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज ट्रस्ट, उरुळी कांचन व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जयंती उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे.

उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता पूजा-पाठ व दीपप्रज्वलनाने होणार असून सकाळी ९ वाजता गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मंगल आरती पार पडेल. त्यानंतर सकाळी ९ वाजता ह.भ.प. मत्सलकर महाराज यांच्या प्रभावी अभंगवाणी व कीर्तनातून संतपरंपरेतील विचारांचे दर्शन घडणार आहे.
दुपारी ११:३० वाजता समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद होणार असून सर्व भाविक व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

उत्सवाच्या आकर्षणाचा भाग म्हणून सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच बाहुबली रथ (पुणे), जय शंकर इव्हेंट अँड मॅनेजमेंट, जय शंकर ब्लास्टर, रासाई देवी झांज पथक, छत्री लाईट शो, श्री गणेश हलगी ग्रुप, महिला लेझीम पथक व वेशभूषा स्पर्धा ही विशेष आकर्षणे असणार आहेत.
याशिवाय दुपारी १ ते २ या वेळेत झी टीव्हीवरील ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध जादुगार शिवम माने यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती उत्सवाला उरुळी कांचन व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव, मित्रपरिवार व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज ट्रस्ट व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.