पुणे : शिंदवणे (ता. हवेली, जि. पुणे) येथे उद्यानविद्या जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम तसेच कृषी विस्तार उपक्रमांतर्गत उद्यानविद्या दूतांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी शेती शाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आधुनिक, शास्त्रीय व शाश्वत शेती पद्धतींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा या शेती शाळेचा मुख्य उद्देश होता.

या शेती शाळेमध्ये परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान उद्यानविद्या दूतांनी फळपिके व भाजीपाला पिकांमध्ये अवलंबावयाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली. रोपांची निवड, योग्य अंतरावर लागवड, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण कसे करावे, उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे वाढवता येईल, याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून खतांची योग्य मात्रा, फवारणीची शास्त्रीय पद्धत व कीडनियंत्रण उपाय समजावून सांगण्यात आले.

या शेती शाळेदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील विविध अडचणी, रोग व किडींबाबत प्रश्न उपस्थित केले. उद्यानविद्या दूतांनी प्रत्येक प्रश्नाला सविस्तर व शास्त्रीय उत्तरे देत शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक माहिती मिळून उत्पादन वाढीस तसेच उत्पन्नात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. शेती शाळा हा शेतकरी-केंद्रित उपक्रम असल्याने अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.
यावेळी सरपंच प्रमिला शितोळे, उपसरपंच भाग्यश्री शिंदे, माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष गणेशद महाडिक, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र जगताप, प्रगतशील शेतकरी संतोष महाडिक, कांतिलाल महाडिक, आबासो महाडिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय, पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, सहयोगी संशोधन संचालक, गणेशखिंड, पुणे तसेच केंद्रप्रमुख डॉ. सुभाष भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उद्यानविद्या महाविद्यालय, पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रद्धा वाबळे आणि डॉ. सुनील जोगदंड यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी उद्यानविद्या दूतांचे आभार मानले.