पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्न रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साकूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मूल्यशिक्षण कार्यशाळा अंतर्गत ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन उत्तर अहिल्यानगर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सुनील मोहटे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून निसर्ग व मानव यांच्यातील समतोल राखण्यासाठी युवकांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी एक तरी झाड लावावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता राठोड होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणीय भान व मूल्याधिष्ठित शिक्षण विकसित होत असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपक फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्पना शेळके यांनी केले. प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा. म्हतू खेमनर यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. रंजित गिरी व प्रा.गणेश कुलकर्णी यांनी करून दिला.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ह.भ.प. पोपट महाराज आगलावे यांनी संत विचार व पर्यावरण संवर्धनाचा मानवी मूल्यांशी असलेला निकटचा संबंध स्पष्ट केला. निसर्गाचे संरक्षण करणे ही केवळ जबाबदारी नसून ती जीवनशैली बनली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता व पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे महत्त्व त्यांनी प्रभावी उदाहरणांद्वारे सांगितले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात शाहीर तुळशीराम जाधव यांनी पर्यावरण जाणीव जागृती संदर्भात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशावर आधारित विविध गीतांच्या माध्यमातून प्रबोधन केले. त्यांनी आपल्या सादरीकरणातून प्राकृतिक पर्यावरण व सामाजिक पर्यावरण यांचे परस्परसंबंध स्पष्ट करत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या लोककलेतील सादरीकरणामुळे कार्यशाळेतील वातावरण प्रेरणादायी झाले.त्यांनी सर्व स्वयंसेवकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली.

कार्यशाळेच्या दोन्ही सत्रांमध्ये पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त समाज, जैवविविधतेचे जतन व शाश्वत विकास या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये संगमनेर महाविद्यालय संगमनेर, अगस्ती महाविद्यालय अकोले, बीएसटी महाविद्यालय संगमनेर,अमृतवाहिनी फार्मसी महाविद्यालय, सिताई महाविद्यालय घारगाव, अश्विन महाविद्यालय मांचीहिल, धन्वंतरी महाविद्यालय ढवळपुरी या विविध महाविद्यालयातील ३६ स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
धन्वंतरी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जमील शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी कौटे पायल, स्नेहल तांबे, लांडे चेतना, गोळे काजल, ओम शेळके या स्वयंसेवकांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. हेमलता राठोड, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य मा. दिपक फिरोदिया, उपप्राचार्य डॉ.सचिन घोलप, धन्वंतरी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जमील शेख, सिताई महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र लेंडे, अश्विन महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय कांबळे, अगस्ती महाविद्यालयाचे सहकार्यक्रम अधिकारी प्रा. शांताराम मधे उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी
प्रा.म्हतू खेमनर,प्रा.सागर गोसावी,प्रा.जया रक्टे , प्रा.प्रियंका हाके,प्रा.दिपक मेंगाळ,प्रा.कल्याणी शिंदे प्राध्यापक व कर्मचारी,स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने प्रा. प्रियंका हाके यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे त्यांनी आभार मानले.