पुणे : एकविसाव्या शतकात मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी असताना स्वसंरक्षणातही त्या सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन तथास्तु कन्सल्टन्सीच्या संस्थापिका ॲड. अश्विनी जगताप यांनी केले.

उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ, महिला कक्ष व लैंगिक छळ विरोधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या निर्भय कन्या अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत महिला सबलीकरण व स्वसंरक्षण या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते. यावेळी व्यासपीठावर शिवमुद्रा मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक रोहित शिंदे व हर्ष जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अमोल बोत्रे, लैंगिक छळ विरोधी समितीच्या समन्वयक प्रा. अंजली शिंदे, महिला कक्षाच्या समन्वयक प्रा. सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या हस्ते करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलताना ॲड. अश्विनी जगताप म्हणाल्या, की मानसिक आरोग्य सुदृढ असेल तरच महिला आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकते, करिअरमध्ये प्रगती करू शकते आणि समाजातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकते.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी महाविद्यालयीन युवतींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत आरोग्य संतुलन राखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. महिला सबलीकरण म्हणजे केवळ शारीरिक सक्षमतेपुरते मर्यादित नसून ती मानसिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्वावलंबन घडवून आणण्याची प्रक्रिया आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुजाता गायकवाड केले तर आभार प्रा. अमोल बोत्रे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शिंदे या विद्यार्थिनीने केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात शिवमुद्रा मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक रोहित शिंदे व हर्ष जाधव यांनी प्रात्यक्षिकांसह कराटेचे प्रशिक्षण देत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण हे केवळ संकटाच्या वेळी उपयोगी पडते असे नाही तर त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मभान, आत्मविश्वास आणि निर्भयतेची भावना निर्माण होते असे प्रशिक्षकांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. अंजली शिंदे, प्रा. कमरून्नीसा शेख, प्रा. बंडू उगाडे, प्रा. रोहित बारवकर, मोरेश्वर बगाडे, अजय दरेकर व विशाल महाडिक यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनींना महाविद्यालयातर्फे अल्पोपहार देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *