पुणे : हवेली तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकारणात जबरदस्त खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपले वर्चस्व कायम राखले असले, तरी पंचायत समितीत मात्र सत्तेच्या चाव्या थेट अपक्षांच्या हातात गेल्याने सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे “अपक्ष जिथे, तिथे सत्ता” अशी स्थिती हवेलीच्या राजकारणात स्पष्टपणे दिसून येत आहे.

हवेली पंचायत समितीच्या एकूण १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेला ७ चा आकडा गाठता न आल्याने राष्ट्रवादीची सत्ता सध्या तरी अधांतरीच आहे. भाजपाने ४ जागांवर समाधान मानले असून शिवसेना (शिंदे गट) ला अवघी १ जागा मिळाली आहे. तर १ जागा अपक्ष उमेदवाराने जिंकत संपूर्ण सत्तासमीकरण ढवळून काढले आहे. आता हा अपक्ष सदस्य कोणाच्या गळ्यात सत्ता घालणार, याकडे साऱ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ६ पैकी ४ जागांवर विजय मिळवला. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना प्रत्येकी एक-एक जागेवर समाधान मानावे लागले. सिंहगड कॉलेज, पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतमोजणी पार पडली. निवडणूक अधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते आणि अर्चना निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया शांततेत पार पडली.

गट क्रमांक ३७ पेरणे–लोणीकंदमध्ये राष्ट्रवादीचे किरण साकोरे यांनी भाजपाचे प्रदीप कंद यांचा ३,०५१ मतांनी पराभव केला. कोरेगाव मूळमध्ये सुरेखा हरगुडे यांनी तब्बल ९,०३४ मतांनी बाजी मारली. थेऊर–आव्हाळवाडीमध्ये कोमल आव्हाळेंचा १४,१४६ मतांचा दणदणीत विजय हा चर्चेचा विषय ठरला.

एकीकडे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची पकड मजबूत, तर दुसरीकडे पंचायत समितीत बहुमताचा खेळ अडकल्याने हवेलीतील राजकीय वातावरण तापले आहे. तडजोडी, बैठका आणि गुप्त हालचालींना वेग आला असून, पुढील काही दिवसांतच हवेलीच्या सत्तेचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *