प्रतिनिधी, रामभाऊ आवारे

निफाड : जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नायगाव तालुका सिन्नर येथील विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय व संस्कारक्षम क्रीडाशिक्षक अशोकराव गंगाधर नवले यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सहस्र चंद्रदर्शन सोहळा तसेच अत्यंत दुर्मीळ व ऐतिहासिक असा भव्य माजी विद्यार्थी मेळावा शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नायगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

मा.श्रीरामजी शेटे साहेब (चेअरमन ,कादवा सह.साखर कारखाना) यांच्या हस्ते अभिष्टचिंतन होणार असून सर्व सेवानिवृत्त गुरुजन अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ज्ञानेश्वर भास्कर सर असणार आहेत. या सोहळ्याची खास बाब म्हणजे, विद्यालयातील अंदाजे ४० सेवानिवृत्त शिक्षक या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार असून त्यांनी घडवलेल्या अनेक पिढ्यांतील विद्यार्थी एकाच व्यासपीठावर भेटणार आहेत.

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते प्रत्यक्ष अनुभवण्याची ही एक दुर्मीळ संधी ठरणार आहे.या माजी विद्यार्थी मेळाव्यात १९७५ ते २००५ या कालावधीत जनता विद्यालयात शिक्षण घेतलेल्या तब्बल तीस वर्षांच्या विविध बॅचमधील माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

एवढ्या मोठ्या कालखंडातील माजी विद्यार्थी एकत्र येण्याचा असा प्रसंग आजवर क्वचितच कुठे घडलेला असून, तालुका व जिल्हा पातळीवर हा मेळावा एक वेगळाच आदर्श निर्माण करणारा उपक्रम ठरणार आहे.

विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अधिकारी, उद्योजक, शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक व समाजसेवक या निमित्ताने आपल्या शालेय आठवणींना उजाळा देणार आहेत. नवले सरांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांमध्ये केवळ क्रीडा कौशल्यच नव्हे तर शिस्त, संघभावना, कष्टाची तयारी, नेतृत्वगुण व सामाजिक बांधिलकी या मूल्यांची रुजवण केली. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या पुढाकारातून हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात नवले सरांचा गौरव, अभिष्टचिंतन, मान्यवरांची मनोगते तसेच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा असे विविध उपक्रम पार पडणार आहेत.पिढ्यान्‌पिढ्या जोडणारा, गुरु–शिष्य नात्याची उजळणी करणारा आणि माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम फक्त एक वाढदिवस सोहळा न राहता, शिक्षण क्षेत्रातील एक लक्षवेधी आणि प्रेरणादायी घटना ठरणार आहे.

या ऐतिहासिक माजी विद्यार्थी मेळाव्यास माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *