पुणे : समाजातील प्रत्येक व्यक्तीने किमान स्वतः सुधारण्याचा प्रयत्न केला तरी त्या कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत व्यसनांच्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यास वाढती व्यसनाधीनता आणि बाल गुन्हेगारी कमी करण्यास नक्कीच मदत होईल. मात्र या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागेल, असे मत परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी व्यक्त केले.

‘निर्भय विद्यार्थी अभियान’ आणि पोलिस उपायुक्त परिमंडळ ७ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी संघर्षग्रस्त बालक व त्यांच्या पालकांसाठी ‘बाल गुन्हेगारी आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर आयोजित जनजागृती कार्यशाळेत ते बोलत होते. या गंभीर सामाजिक विषयासाठी आगामी काळात पुणे पोलिस आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नियोजनबद्ध पुनर्वसन कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमास मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर, खराडी विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, परिवर्तन संस्थेच्या समुपदेशिका रेश्मा कचरे, ‘निर्भय विद्यार्थी अभियान’चे संस्थापक सदस्य निखिल गायकवाड यांच्यासह पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, नंदकुमार गायकवाड, निलेश बडाख, गोविंद जाधव आणि सुनीता रोकडे उपस्थित होते.

कार्यशाळेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक नीरज शेवडे यांनी स्वतःच्या अनुभवातून शालेय जीवनातील व्यसनाधीनतेमुळे झालेली वैयक्तिक व कौटुंबिक वाताहत कथन केली. मुक्तांगणच्या माध्यमातून व्यसनावर मात करून आज व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सन्मानाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आगामी काळात विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी मोफत व्यसनमुक्ती उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. रेश्मा कचरे यांनी मानसिक आरोग्यातील बदल, नैराश्य आणि त्यातून उद्भवणारे गंभीर गुन्हे किंवा आत्महत्यांसारखे प्रकार रोखण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविण्यात येणार असल्याचे सांगितले.

सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी विधी संघर्षग्रस्त बालके व त्यांच्या पालकांनी कायद्याचे पालन करून स्वतःच्या प्रगतीसाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आगामी काळात पुणे पोलिसांच्या सहकार्याने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, परिवर्तन संस्था आणि निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विधी संघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक व नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे निखिल गायकवाड यांनी सांगितले.

या उपक्रमात परिमंडळ सात विभागातील सुमारे १०० हून अधिक विधी संघर्षग्रस्त बालक व त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *