पुणे: पुण्याच्या बदलत्या रूपात अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या, पण प्रभात रोडच्या अगदी सुरुवातीला अन्नाचा खमंग सुवास दरवळणारे एक नाव पाच दशकांनंतरही तितक्याच दिमाखात उभे आहे ते म्हणजे ‘दर्शन’. १९७६ मध्ये एका छोट्याशा स्वप्नातून सुरू झालेला हा प्रवास आज ५० वर्षांचा झाला आहे. ही केवळ एका रेस्टॉरंटची यशोगाथा नाही, तर ती कष्ट, निष्ठा आणि चवीशी कधीही तडजोड न करणाऱ्या एका कुटुंबाची धडपड आहे.

संघर्षातून फुलेले स्वप्न
१९७६ साली सीतल आहुजा यांनी या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पुण्यातील प्रसिद्ध ‘द्वारिका’ रेस्टॉरंटचे संस्थापक श्री. लालजीभाई ठक्कर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सुरुवातीला हॉटेल व्यवसाय सोपा वाटला असला तरी, वास्तवात तो अपार कष्टाचा होता. पहाटेच्या वेळी स्वतः मंडईत जाऊन भाजीपाला पारखून घेण्यापासून ते रात्री स्वतः शटर ओढेपर्यंत, शीतलजींनी ‘दर्शन’चा पाया स्वहस्ते रचला. सुरवातीला केवळ ज्यूस बार असलेल्या या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीनुसार एक-एक पदार्थ वाढत गेला आणि आज १५० पेक्षा जास्त पदार्थांची रेलचेल असलेले हे पुण्याचे आवडते ‘फूड डेस्टिनेशन’ बनले आहे.

‘ शुद्धतेचा’ पुणेरी बाणा
‘दर्शन’च्या यशाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यांची गुणवत्तेशी असलेली बांधिलकी. आजही येथे MSG (अजिनोमोटो), कृत्रिम रंग किंवा संरक्षक (Preservatives) यांचा वापर पूर्णपणे निषिद्ध आहे. स्वतःचे शुद्ध पाण्याचे फिल्टरेशन आणि बर्फाची मशीन, स्टेनलेस स्टीलच्या हायजिनिक ज्यूस मशिन्स आणि दररोज मार्केटमधून येणारा ताजा भाजीपाला आणि फळे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच, जेव्हा कोणाला रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी ‘हटके’ आणि तरीही पोटाला त्रास न देणारे हवे असते, तेव्हा ‘दर्शन’ हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

नाती जपली, माणसे जोडली
या व्यवसायाचे वेगळेपण म्हणजे येथील कर्मचारी. मॅनेजर विन्सेट गेल्या ४५ वर्षांपासून येथे कार्यरत आहेत. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील ‘गंगद्वार’ गावाशी दर्शनचे अनोखे नाते जुळले आहे. आज या गावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती दर्शनमध्ये किंवा त्यांच्या ‘जस्ट कॅज्युअल्स’ या ब्रँडमध्ये काम केलेले आहे. काही वेळा तर वडील आणि मुलगा दोघांनीही एकत्र काम केले आहे. हा केवळ व्यवसाय नसून ३०० कुटुंबांचा एक मोठा ‘दर्शन परिवार’ आहे.

नव्या पिढीची आधुनिक जोड
२०१४ मध्ये कुणाल आणि विशाखा या दुसऱ्या पिढीने व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी प्रदीर्घ अनुभवाला आधुनिक मॅनेजमेंटची जोड दिली, ज्यातून २०१८ मध्ये बाणेर येथे दुसरी यशस्वी शाखा विस्तारली. शीतलजींच्या पत्नी श्रीमती लविना आहुजा यांनी या प्रवासात दिलेला खंबीर पाठिंबा आणि श्रद्धा काळे यांनी सांभाळलेली आर्थिक शिस्त यामुळे हे साम्राज्य विस्तारले आहे.
दर्शनच्या वटवृक्षाचा विस्तार होवून आता दर्शनच्या एकूण दोन शाखा आणि जस्ट कॅज्युअल्सचे १२ स्टोअर्स असा प्रचंड विस्तार झाला आहे. व्यवसायाचा विस्तार होऊन ‘जस्ट कॅज्युअल्स’ची १२ स्टोअर्स सुरू झाली.

आज ‘दर्शन’ हे केवळ एक रेस्टॉरंट राहिले नसून पुण्याच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे. प्रामाणिक सेवा आणि ‘काहीतरी हटके’ देण्याच्या जिद्दीमुळे ५० व्या वर्षातही इथल्या चवीची जादू कायम आहे.
आज ५० वर्षांनंतरही, एखादा ग्राहक जेव्हा दर्शनमध्ये येतो, तेव्हा त्याला तीच जुनी चव आणि तेच आपुलकीचे वातावरण मिळते. ‘दर्शन’ने केवळ खाद्यपदार्थ वाढले नाहीत, तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास जपला आहे. सचोटीने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला जेव्हा प्रेमाची जोड मिळते, तेव्हा ‘दर्शन’सारखा देदीप्यमान सुवर्णमहोत्सव साजरा होतो.

अधिक माहितीसाठी संपर्क
विजय अंबाडे, मो. ९८२३० १६३६१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *