पुणे : वाघापूर (ता. पुरंदर ) सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री माणकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा उत्साहात पार पडला. यंदा या सप्ताहाचे सतरावे वर्ष असून, भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “महाशिवरात्री हा दिवस महत्त्वाकांक्षी साधकांसाठी अत्यंत स्फूर्तीदायक आहे. या दिवशी शिवाने सर्व शत्रूंवर विजय मिळविला.

नवदांपत्यांना हा दिवस जीवनातील तडजोडी शिकवणारा व रहस्यमय असा आहे. योग्यांना योगसामर्थ्य प्राप्त होते. संसाररूपी दुःखातील विष प्राशन करून नवीन चेतना निर्माण व्हावी, हा या पवित्र दिवसाचा संदेश आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी महाशिवरात्री व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे.”
नैसर्गिक अरण्यातील हे प्राचीन व जागृत देवस्थान असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, नवनाथांपैकी अडबंगनाथ यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुण्यवान झाली आहे. येथे केलेली साधना सफल होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी गावभूषण माजी पोलीस अधिकारी कृष्णाजी इंदलकर, अर्जुन भाऊ फौजी, ह.भ.प. बापूसो गायकवाड महाराज, बापू किसन कुंजीर, देवेंद्र पांडुरंग कुंजीर, विजय तुकाराम कुंजीर, वसंत गुरुजी, रोहिदास कुंजीर, रामदास आप्पा, कैलास तात्या, बाजीराव नाना कुंजीर, अरुण तात्या, रामचंद्र कुंजीर, अशोक कुंजीर, गौतम दादा कुंजीर, मच्छिंद्र कुंजीर, दादा कुंजीर, बापू कुंजीर, योगेश कड, रवानाना कुंजीर, माऊली इंदुलकर, संतोष कुंजीर, नारायण देव, सरपंच सौ. दिपाली कुंजीर, सौ. सविता कुंजीर, सौ. दीक्षित बाई, सौ. विजयंता इंदलकर, सौ. सुमनताई वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्यात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अनंता महाराज परदेशी (शिरवली, बारामती), ह.भ.प. सतीश महाराज खोमणे (थोपटेवाडी), ह.भ.प. झाडे महाराज (ढोकी), ह.भ.प. शिवाजी महाराज पवार (श्रीगोंदा), ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव (सातारा) यांची सुश्राव्य कीर्तने झाली. तसेच वारकरी भूषण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर) यांचे काल्याचे कीर्तन रंगले.
महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर डॉ. रवींद्र भोळे यांचे विशेष प्रवचन तसेच मंदिराचे पुजारी दिव्यानंदगिरी मौनगिरी महाराज यांचे शिवपुराणावर आधारित मार्गदर्शन झाले. समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.