पुणे : मोरया वन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
या वेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, “शिवजयंती साजरी करताना महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार समाजाने आचरणात आणला पाहिजे. महापुरुषांचे विचार केवळ घोषणांपुरते न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे गरजेचे आहे.” त्यांनी शिवरायांच्या कार्याची आठवण करून देत सामाजिक ऐक्य व बंधुतेचा संदेश दिला.

कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला तसेच नृत्य व गायन स्पर्धा घेण्यात आल्या. नीलम इचके यांनी शिवछत्रपतींवरील प्रेरणादायी व्याख्यान सादर केले. साने संगीत लोककला मंच यांच्या वतीने शिवरायांवरील जोशपूर्ण पोवाड्यांनी वातावरण दणाणून सोडले.

कलामंचच्या विद्यार्थ्यांनीही अंगावर शहारे आणणारे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल कुंजीर यांनी केले. उपस्थित शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सोसायटीचे सचिव अमर गोडगे, संचालक विनायक खेडकर, रुपेश उघडे, संदीप जाधव, निलेश पायगुडे व शुभम गारमळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.