पुणे : “गरीबांचे दुःख काय असते, हे एसी-गाड्यांत फिरणाऱ्या मंडळींना कधीच कळणार नाही,” अशा शब्दांत आदिवासी सेवक नामदेव भोसले यांनी राज्यातील वाढत्या सामाजिक अन्यायावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील गरीब, आदिवासी, पारधी व भटक्या-विमुक्त समाजावर अन्यायाचे प्रमाण वाढत असून शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील आदिवासी पाड्यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. पुणे, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सौरपॅनल प्रकल्पांच्या नावाखाली आदिवासी वस्त्यांलगतच्या गायरान व गावठाण जमिनींवर अतिक्रमण केले जात असल्याची तक्रार त्यांनी मांडली.
“ज्या बाजूला आदिवासी कुटुंबे राहतात, त्याच भागातील जमिनी सौरपॅनलसाठी वापरल्या जात आहेत. जिवंतपणी घरासाठी जागा नाही आणि मृत्यूनंतर दफनासाठीही जागा मिळत नाही, ही दुर्दैवी परिस्थिती आहे,” असे भोसले यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वमने, पोलीस निरीक्षक संतोष खेडेकर व पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बाबा भोसले, शादिप भोसले, अजय पवार, गुलकेश काळे, जितू काळे, रेश्मा काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आजही शिक्षण, आरोग्य, निवारा व रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध योजना कागदावरच राहतात; प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहोचत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. “आजपर्यंत कोणतेही सरकार गरिबांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवू शकले नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आदिवासी व पारधी समाजाकडे अजूनही संशयाच्या नजरेने पाहिले जाते. गावात एखादी घटना घडली की प्रथम त्यांच्यावरच संशय घेतला जातो, ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे, असे ते म्हणाले. सामाजिक सन्मान, न्याय आणि समान संधी हा त्यांचा हक्क असून तो प्रत्यक्षात मिळण्यासाठी शासनाने ठोस अंमलबजावणी करावी, स्थानिक पातळीवर जबाबदारी निश्चित करावी आणि वंचित घटकांसाठी विशेष कृती आराखडा राबवावा, अशी मागणी भोसले यांनी केली.
राज्यातील सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.