पुणे : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अमृतानुभव फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘विश्व मराठी भाषा कर्तृत्व संमेलन २०२६’मध्ये हिंजवडी येथील पवार पब्लिक स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. जयश्री किरण नवले यांची ‘महाराष्ट्र आदर्श शिक्षिका मराठी भाषा रत्न पुरस्कार’ासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे.

मराठी भाषेचे संवर्धन, संस्कृतीची जपणूक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे त्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिरुची निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. भाषेची गोडी वाढविणारे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच समाजाभिमुख शैक्षणिक प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.

हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता पत्रकार भवन, पुणे येथे संपन्न होणार आहे. ‘सारेगमप’ फेम सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वरजी मेश्राम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
“सौ. नवले यांचे कार्य भावी पिढीसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. मराठी भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले. त्यांच्या या यशाबद्दल पवार पब्लिक स्कूल तसेच शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्था – अमृतानुभव फाउंडेशन, पुणे
पुरस्कार – महाराष्ट्र आदर्श शिक्षिका मराठी भाषा रत्न पुरस्कार
वेळ – दि. २८ फेब्रुवारी २०२६, दुपारी २.०० वाजता
स्थळ – पत्रकार भवन, पुणे