पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीत वृक्षतोडीबाबत कडक कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असून, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची विनापरवाना वृक्षतोड अथवा वृक्षांना हानी केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम २०२१ या कायद्यांनुसार विना परवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहोचवणे हा दंडनीय गुन्हा आहे. शासनाद्वारे अधिसूचित पद्धतीनुसार काढलेल्या मूल्याइतका, परंतु कमाल एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

याशिवाय महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम २००९ व मुंबई उच्च न्यायालय यांच्या २० सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशानुसार वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज राबविण्यात येत आहे.
महानगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, होळी सणाच्या निमित्ताने होळीसाठी कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि शहरातील हरित क्षेत्र जपण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्षतोड करत असल्याचे किंवा वृक्षांचा विस्तार कमी करत असल्याचे आढळल्यास, संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे मा. महापालिका सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी / वृक्ष प्राधिकरण कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्याकडे तक्रार नोंदवावी. तसेच टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२, व्हॉट्सअॅप क्रमांक ९६८९९००००२ किंवा www.complanit.punecorporation.org� या तक्रार पोर्टलवर तक्रार करता येणार आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक उद्यान अधीक्षक श्री. रत्नाकर करडे (मो. ९६८९९३८५२३) यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *