पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कम्युनिटी एंगेजमेंट कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी विद्यालय येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आरोग्य, स्वच्छता व वैज्ञानिक जनजागृतीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात त्वचेची निगा व वैयक्तिक स्वच्छता, मुलींसाठी मासिक पाळी काळातील स्वच्छता, सुरक्षित पाणी व स्वच्छता व्यवस्थापन तसेच अन्न सुरक्षा या विषयांवर पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील स्वच्छतेच्या सवयी, पोषणमूल्ययुक्त आहाराचे महत्त्व आणि स्वच्छ पाण्याच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माहितीपूर्ण सादरीकरणास शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण व अभिप्राय फॉर्म भरून घेण्यात आले. त्याआधारे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सवयी व जागरूकतेचा अभ्यास करणे शक्य झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले तसेच शिक्षिका उज्ज्वला कांचन यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.

सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनुजा झाटे व प्रा. स्वाती मासळकर यांनी नियोजन केले. समाजाभिमुख शिक्षणाची जाणीव निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *