पुणे : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांची नियुक्ती असली, तरी आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ४ मे २०२६ नंतर कोणत्याही क्षणी ग्रामपंचायत निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करू शकतो, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रभाग रचनेचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया वेगात सुरू आहे.

आयोगाने आखलेले वेळापत्रक पुढीलप्रमाणे —
२० फेब्रुवारी २०२६ : गुगल मॅपच्या आधारे प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार
२७ फेब्रुवारी २०२६ : तलाठी व ग्रामसेवकांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व सीमा निश्चिती
११ मार्च २०२६ : प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर
२३ ते ३० मार्च २०२६ : प्रभाग रचनेला प्राथमिक मान्यता
७ एप्रिल २०२६ : हरकती व सूचनांसाठी अंतिम मुदत
४ मे २०२६ : अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी व प्रसिद्धी
४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो.

थेट सरपंच निवड; प्रतिष्ठेच्या लढती ठरणार!
यंदा सरपंच पदाचे आरक्षण आधीच जाहीर झाले असून, सरपंचाची निवड थेट मतदारांमधून होणार आहे. त्यामुळे गावागावांत प्रतिष्ठेच्या लढती रंगणार हे निश्चित मानले जात आहे. अनेक बडे नेते आता पुन्हा गावपातळीवर सक्रिय होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून बसलेले इच्छुक आता थेट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, प्रभाग रचना अंतिम होताच प्रचारयुद्धाला सुरुवात होणार, यात शंका नाही.

४ मेनंतर राज्यातील ग्रामराजकारण तापणार, आणि ग्रामपंचायत निवडणुका यंदा केवळ औपचारिक न राहता थेट सत्तेची प्रतिष्ठेची लढत ठरणार, हेच या घडामोडींमधून स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *