पुणे : श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘अजित कृषी’ या भव्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडणार असून उद्घाटनासाठी राज्याचे सहकार मंत्री मा. ना. दिलीप वळसे पाटील व कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या निमित्ताने झालेल्या बैठकीस हवेली तालुक्याचे आमदार माऊली आबा कटके, माजी आमदार अतुल बेनके, रमेश आप्पा थोरात, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुरेश आण्णा घुले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस पै दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी प्रदर्शनाची तयारी सुरू झाल्याची माहिती दिली.

प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय पीक पद्धतींसह पशुपक्षी प्रदर्शनाचाही समावेश करण्यात आला असून सुमारे २०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची शेती अवजारे, बियाणे, कीटकनाशके, हरितगृहे, कृषी जैविक तंत्रज्ञान, हॉर्टिकल्चर, मासेमारी, अक्वाकल्चर, डेअरी तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया उद्योग, वेअरहाऊस, अपारंपरिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, कृषी बाजार, अर्थसाहाय्य संस्था, सेंद्रिय शेती, शेळी-मेंढी पालन, समूह शेती, शेतकरी बचत गट, दुग्धविकास आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला व कृषिकन्यांचा ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशांत कल्याणकर, सौ. सीमा प्रशांत कल्याणकर तसेच प्रतिष्ठानचे समन्वयक बापू सोनवणे उपस्थित होते. प्रदर्शनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून कृषी विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.