पुणे : उरुळी कांचन पोलिस ठाणे हद्दीत सोमवारी (ता. २) दुपारी जुन्या शेती वादातून कारने दुचाकीला जोरदार धडक देत तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवरापूर (ता. हवेली, जि. पुणे) येथील साठे वस्ती परिसरात दुपारी सुमारे पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महेश लक्ष्मण साठे (वय ३२, व्यवसाय शेती, रा. भवरापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी लक्ष्मण सोपान साठे (वय ५८, रा. भवरापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जमीन गट क्र. १०४ मधील जुना वाद तसेच सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अक्षय दशरथ साठे (वय ३२, रा. भवरापूर) व त्याचा साथीदार गोकुळ नाना कोकरे (वय २३, रा. अष्टापुर) यांनी संगनमताने ही घटना घडविल्याचा आरोप आहे.

आरोपींनी त्यांच्या हुंडाई कंपनीच्या आय-२० (MH१२ QY ७८८८) कारने महेश साठे यांच्या हिरो होंडा पॅशन (MH १२ CJ ९५५१) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात महेश साठे यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१/२०२६, बीएनएस कलम १०३(१), ३(५) अन्वये खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा रात्री पावणे नऊ वाजता नोंदविण्यात आला.

आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपघातासंदर्भातील गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर गोकुळ कोकरे याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *