पुणे : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायत येथे जन्म-मृत्यू नोंदणी संदर्भात गंभीर प्रशासकीय गोंधळ समोर आला असून २०२३ व २०२४ मधील शेकडो जन्म नोंदी अजूनही CRS पोर्टलवर ऑनलाइन करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना जन्म दाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असून लहान मुलांचे आधारकार्ड काढणे तसेच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायत उरुळी कांचन येथे दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत केंद्र शासनाच्या CRS पोर्टलवरील “Add Old” टॅबमध्ये एकूण १४५८ जन्म नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८३२ पुरुष, ६२६ स्त्री व तृतीयपंथी शून्य अशा नोंदी आहेत. त्याचप्रमाणे १२७ मृत्यू नोंदी करण्यात आल्या असून त्यात ७३ पुरुष व ५४ स्त्रिया यांचा समावेश आहे. या सर्व नोंदी पूर्वीच्या कायदेशीर नोंदवहीत नोंद झालेल्या असून त्या नंतर “Add Old” टॅबद्वारे पोर्टलवर नोंदवण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.

मात्र, ३१ डिसेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील जन्म-मृत्यू नोंदी CRS पोर्टलवर करण्यासाठी “Add Old Birth Event” टॅबमध्ये संबंधित दिनांकाचा पर्याय उपलब्ध नसल्याने ऑनलाइन नोंदणी करता येत नसल्याची गंभीर समस्या ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
या कालावधीत ग्रामपंचायत उरुळी कांचन अंतर्गत ८०७ जन्म नोंदी व २३२ मृत्यू नोंदी लिखित रजिस्टरमध्ये असतानाही त्या पोर्टलवर नोंदवता येत नसल्यामुळे नागरिकांना ऑनलाइन जन्म प्रमाणपत्र देणे शक्य होत नाही.

परिणामी अनेक पालकांना आपल्या मुलांचे आधारकार्ड काढताना अडचणी येत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशावरही परिणाम होत आहे.

यासंदर्भात प्रसाद ज्ञानदेव धेंडे (रा. आश्रम रोड, उरुळी कांचन ) यांनी गंभीर तक्रार नोंदवली आहे. त्यांनी सांगितले की, २१ एप्रिल २०२५ रोजी ग्रामपंचायतीकडून मुलीचा जन्म दाखला घेतला होता. मात्र, आधारकार्ड काढण्यासाठी गेल्यानंतर त्या दाखल्यावरील QR कोड अमान्य असल्याचे सांगण्यात आले. याबाबत त्यांनी मागील ८-९ महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला, परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून “१० दिवसात होईल, १५ दिवसात होईल” अशी उत्तरे मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

धेंडे यांच्या मते, आधारकार्ड नसल्यामुळे त्यांच्या मुलीला शासनाच्या विविध बालिका योजनांचा लाभही मिळू शकलेल्या नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने समस्या सोडवून ऑनलाइन जन्म प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी CRS पोर्टलवरील तांत्रिक अडचण तात्काळ दूर करावी, अशी विनंती ग्रामपंचायतीने जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू), जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे केली आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे संतापाची लाट असून उरुळी कांचन ग्रामपंचायतीतील जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *