पुणे : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (५ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना एक आक्रमक आणि वेगळा उमेदवार चर्चेत आला आहे. महाराष्ट्र लोक काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष उमेशभैय्या महादेव म्हेत्रे यांनी मुंबईतील विधान भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करून पारंपरिक पैशाच्या राजकारणाला खुले आव्हान दिले आहे.
दौंड तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले उमेश म्हेत्रे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास गो. आठवले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सीमा तांबे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांनी १० हजार रुपयांचा डिपॉझिटही जमा केला.

राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून उमेश म्हेत्रे यांची नोंद झाली असल्याची चर्चा आहे. मागील पंधरा दिवसांपासून आवश्यक कागदपत्रे गोळा करून त्यांनी हा अर्ज भरला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत त्यांनी संपूर्ण विधान भवन परिसराची फेरी मारली. त्यानंतर पास जमा करून ते बाहेर आले.
यावेळी बोलताना उमेश म्हेत्रे यांनी सध्याच्या राजकारणावर जोरदार टीका केली. “राष्ट्रीय पक्षांमध्ये उमेदवारी ही पैसेवाल्यांना दिली जाते. मग सामान्य शेतकऱ्याचा मुलगा फॉर्म का भरू नये? संविधानाने मला देखील अधिकार दिला आहे,” असा सवाल त्यांनी केला.

म्हेत्रे म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी आमदार शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्याचे आश्वासन देतात. मात्र निवडून आल्यानंतर मुंबईची हवा लागली की शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न विसरले जातात.”
ऊस, कांदा, सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा यांसारख्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी विधानसभेत कोणी भांडत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
“महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठीच मी राज्यसभेची उमेदवारी भरली आहे.
निवडून आलो तर दिल्लीतील संसदेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार. गरज पडली तर संसदेत आणि संसदेबाहेर आंदोलनही करणार,” असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्याचा मुलगा म्हणून राज्यसभेच्या निवडणुकीत उडी घेतल्याने उमेश म्हेत्रे यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.