पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ तांत्रिक संकल्पना नसून भविष्यातील जीवनशैली बदलणारी महत्त्वाची शक्ती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयला घाबरण्याऐवजी त्याचा योग्य वापर शिकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हैदराबाद येथील गुगल प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रितेश करे यांनी केले.

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात संगणक विभागाच्या वतीने “एआय अँड यू : फ्रॉम क्लासरूम टू करिअर” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते.

व्यासपीठावर संगणक विभाग प्रमुख प्रा. वैशाली चौधरी, प्रा. प्रतीक आढाव तसेच कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. मयुरी शितोळे उपस्थित होते.

पुढे बोलताना करे म्हणाले, एआय माणसाची जागा घेण्यासाठी नाही, तर माणसाच्या क्षमतांना अधिक सक्षम करण्यासाठी आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी मूल्ये जपणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी सांगितले की, भविष्यातील रोजगाराच्या संधी या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाशी निगडित असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करणे आणि त्यानुसार स्वतःला तयार करणे ही काळाची गरज आहे.

कार्यक्रमादरम्यान महात्मा गांधी सर्वोदय संघाचे कार्यवाह सोपानराव कांचन यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आजच्या युगात एआय समजून घेणे ही विद्यार्थ्यांची गरज बनली आहे. कारण भविष्यात शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कला विभाग प्रमुख प्रा. डॉ. समीर आबनावे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नंदिनी सोनवणे तसेच कार्यालय अधीक्षक प्रदीप राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा शितोळे यांनी केले, तर आभार प्रा. हर्षल भोसले यांनी मानले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *