पुणे : सामाजिक एकतेचा संदेश देणारी आगळी-वेगळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उरुळी कांचन (ता. हवेली) येथे पुणे दख्खन संस्थेचे विश्वस्त तथा मुस्लिम मावळा खलिल महेमुद शेख यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या शिवजयंती उपक्रमाने उपस्थितांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या खलिल शेख यांनी इतिहास वाचनासोबतच गडकिल्ले संवर्धनाचे कामही केले आहे. त्यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमस्थळी शिवकालीन इतिहासाची माहिती देणारे डिजिटल बॅनर्स लावण्यात आले होते. उपस्थित मान्यवर व नागरिकांचे स्वागत थंड पेय ‘ताक’ देऊन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, कला, आध्यात्मिक, वैद्यकीय, क्रीडा, कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उरुळी कांचन महावितरणचे अधिकारी, ग्रामस्वच्छता अभियानाचे पदाधिकारी, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पंचायत समिती सदस्या, महिला प्रतिनिधी, युवा वर्ग तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, श्री काळभैरवनाथ उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उपक्रमास सदिच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यामागे केवळ परंपरा नसून मोठा इतिहास आणि प्रेरणा आहे. महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे करून ‘रयतेचे राज्य’ निर्माण केले. जात-धर्म बाजूला ठेवून माणसाला माणूस म्हणून न्याय दिला. हीच न्यायाची आणि स्वाभिमानाची भावना पुढील पिढीत टिकून राहावी, यासाठी दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्याची भावना आयोजक खलिल शेख यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी आपल्या धर्मपत्नीचे विशेष आभार मानले. “त्यांची साथ नसती तर हा उपक्रम शक्य झाला नसता,” असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *