पुणे : संतपरंपरेचे जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीच्या विकासाचा प्रश्न थेट राज्यसभेत पोहोचला आहे. राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत लक्षवेधीद्वारे केंद्र सरकारकडे आळंदीचा ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ योजनेत तातडीने समावेश करण्याची जोरदार मागणी केली.

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राने विशेष पावले उचलण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे आळंदीला देशभरात पवित्र तीर्थक्षेत्राचा मान आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात लाखो वारकरी येथे दाखल होत असतात. या काळात शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग आणि सार्वजनिक सुविधांवर प्रचंड ताण येतो. त्यामुळे आळंदीच्या नियोजनबद्ध आणि आधुनिक विकासाची आवश्यकता अत्यंत तीव्र असल्याचे कुलकर्णी यांनी सभागृहात स्पष्ट केले.

केंद्र सरकारने अलीकडील अर्थसंकल्पात मंदिर असलेल्या शहरांच्या आणि टियर-२ शहरांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीला ‘टेंपल टाउन’चा दर्जा मिळाल्यास आधुनिक सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, नदीकिनारा विकास, पूरनियंत्रण, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग, रस्ते संपर्क आणि वारसा संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

इंद्रायणी नदीशी आळंदीची ओळख घट्ट जोडलेली असल्याचे सांगत नदीचे प्रदूषण नियंत्रण, पुनरुज्जीवन आणि नदीकाठाचा शाश्वत विकास यासाठी एकात्मिक नियोजनाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

आळंदीला ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ योजनेत समाविष्ट केल्यास आध्यात्मिक वारसा जपत आधुनिक पायाभूत सुविधा उभारता येतील आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांना अधिक सुसज्ज व सन्मानजनक अनुभव मिळेल. यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानातही मोठी सुधारणा होईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *