पिंपरी : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण–इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम भारतातील उद्योगांवर होत असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या असून आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे औद्योगिक गॅसचा तुटवडा निर्माण होऊन लघुउद्योग संकटात सापडले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.

पिंपरी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष तात्या सपकाळ आणि संचालक संजय सातव उपस्थित होते.

यावेळी संजय जगताप म्हणाले की, उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी औद्योगिक गॅसचा राखीव कोटा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. केंद्र व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅसचा नियमित पुरवठा सुरू करावा, अशी संघटनेची मागणी आहे.

सचिव जयंत कड यांनी सांगितले की, आखाती देशांतून येणाऱ्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने भारतात येणाऱ्या गॅसचे प्रमाण अनिश्चित झाले आहे. त्यामुळे गॅसच्या दरात वाढ होत असून अनेक ठिकाणी औद्योगिक गॅसचा पुरवठा कमी झाला आहे किंवा बंद झाला आहे. परिणामी उद्योगांचे उत्पादन आणि नियोजन विस्कळीत झाले आहे.

संचालक संजय सातव म्हणाले की, फॅब्रिकेशन, पावडर कोटिंग आणि सीडी कोटिंगसारख्या प्रक्रियांसाठी एलपीजी गॅस मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सुमारे सात ते आठ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि रांजणगाव येथील अनेक लघुउद्योजक हे बजाज, महिंद्रा, थरमॅक्ससह मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांवर अवलंबून आहेत. जीएसटी, नोटाबंदी, कोरोना काळातील लॉकडाऊन, महागाई आणि बँक कर्जाच्या ओझ्यातून उद्योग अद्याप पूर्णपणे सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईवर केंद्र व राज्य शासनाने तातडीने तोडगा काढून पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा अनेक उद्योगांना कारखाने बंद करण्याची वेळ येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *