पुणे : फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने केलेल्या कारवाईत एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस तसेच लाल रंगाची आय-२० चारचाकी असा सुमारे ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फुरसुंगी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार परिसरात अवैध धंदे, गुन्हेगार तपासणी व गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करत होते. दि. ७ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार नितीन गायकवाड व सागर वणवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उरुळी देवाची येथील कोंडे वस्ती, झांबरे गोठ्याजवळ लाल रंगाच्या आय-२० चारचाकीमध्ये तीन संशयित इसम थांबले असून त्यातील एकाकडे पिस्टलसारखे शस्त्र असण्याची शक्यता आहे.

ही माहिती पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार व बापुसाहेब खंदारे यांनी वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने पंचांसह घटनास्थळी जाऊन कारवाई केली. तेथे दिलेल्या वर्णनाप्रमाणे कारमध्ये तीन संशयित आढळून आले. पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींची नावे शुभम चिमा गायकवाड (वय २५, रा. हिंदवी नगर, उरुळी देवाची, मूळगाव मानेगाव वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर), गौरव हनुमंत भाडळे (वय २४, रा. आंबेडकर चौक, उरुळी देवाची) आणि नागेश गोपाळ निलेवाड (वय २३, रा. डोले वस्ती, समता शाळेजवळ, उरुळी देवाची) अशी असल्याचे समोर आले.

संशय बळावल्याने पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता शुभम गायकवाड याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळून आले. आरोपींकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस व आय-२० कार असा एकूण सुमारे ५.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस तपासात आरोपी शुभम गायकवाड व नागेश निलेवाड यांच्यावर लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गौरव भाडळे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मारहाण व दंगलीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी फुरसुंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ-६) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उधनले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल गोरे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलिस उप निरीक्षक विष्णू देशमुख, बापुसाहेब खंदारे, उमेश जगताप, सहाय्यक पोलिस फौजदार हरिदास कदम, पोलिस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव तसेच पोलिस अंमलदार हेमंत कामथे व अभिजीत टिळेकर यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *