पुणे : पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा–मुठा नदी पात्रात दररोज मोठ्या प्रमाणावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याविरोधात एमआयटी एडीटी विद्यापीठात मधील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा तीव्र ‘कचरा बंद’ आंदोलन छेडले आहे.
लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींसह परिसरातील काही गावांकडून दररोज अंदाजे ३५ ते ४० ट्रॅक्टर कचरा नदीपात्रात टाकला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात (४ मार्च) विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत कचरा वाहून नेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी राजकुमार शिंदे यांनी मध्यस्थी करत संबंधित ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती.

विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देत सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच राहिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी पुन्हा तीव्र भूमिका घेत कचऱ्याच्या गाड्या प्रवेशद्वारावरच अडवल्या आहेत. जोपर्यंत नदीपात्रात कचरा टाकणे पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
या आंदोलनाला अखिल भारतीय विद्यापीठ परिषद (एबीव्हीपी) नेही जाहीर पाठिंबा दिला असून विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायती आणि विद्यार्थ्यांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागली होती भीषण आग
२६ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना भीषण आग लागली होती. ही आग सलग चार दिवस धुमसत राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर विषारी धूर पसरला. त्यामुळे विद्यापीठातील सहा ते सात विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास आणि गुदमरल्याची लक्षणे दिसून आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.
या घटनेनंतर हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी-काळभोरचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, ग्रामपंचायतींचे माजी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी नदीपात्रातील कचरा टाकण्याच्या जागेला भेट दिली होती. मात्र, अद्याप या गंभीर प्रश्नावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.
दररोज सुमारे ७० टन कचरा
दररोज सुमारे ७० टन कचरा थेट नदीपात्रात टाकला जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. दुर्गंधी, वारंवार लागणाऱ्या आगी आणि विषारी धुरामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
‘ नदीपात्रात कचरा टाकणे तात्काळ बंद करा’
मागील आंदोलनावेळी ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा हा प्रकार तात्काळ बंद करण्याची मागणी आंदोलनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात येत असल्याचे विद्यार्थी दादासाहेब भोसूरे यांनी सांगितले.
‘ पर्यायी जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावावी’
एमआयटी एडीटी विद्यापीठाने स्थानिक ग्रामपंचायतींना कायम सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र नदीपात्रात कचरा टाकणे अत्यंत चुकीचे असून त्यामुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यापूर्वी ग्रामपंचायतींनी गायरानातील दोन एकर जागा कचरा प्रकल्पासाठी देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दिला होता. त्यामुळे ग्रामपंचायतींनी सामंजस्याची भूमिका घेऊन पर्यायी जागेवर तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी विनंती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी केली.