पुणे : सिंहगड किल्ला येथे छत्रपती राजाराम महाराज यांच्या ३२६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रम भक्तीभाव आणि उत्साहात पार पडला. सिंहगड किल्ल्याचा विकास रायगड किल्ला व शिवनेरी किल्ला यांच्या धर्तीवर करण्यात यावा, तसेच राजाराम महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी शासन आणि जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती युवराज हिरामण काकडे यांनी दिली.

राजाराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंहगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात काकडे यांच्या हस्ते महाराजांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रुपाली कोंडे, पंचायत समिती सदस्या शुभांगी खिरीड, सदस्य युवराज वांजळे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, इतिहास संशोधक नंदकुमार मते, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय घोरपडे, फॉरेस्ट अधिकारी बळीराम वायकर, मोडी लिपी अभ्यासक अशोक पाटील, प्रा. देशमुख, नगरसेवक सचिन दोडके, अमित गायकवाड तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ढमढेरे परिवार, स्थानिक पदाधिकारी, शिवप्रेमी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवराज काकडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती असलेल्या राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाच्या कठीण काळात स्वराज्य टिकवण्यासाठी मोठा लढा दिला. त्यांचे निधन ३ मार्च १७०० रोजी सिंहगड किल्ल्यावर झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी येथे पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जातो.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राजाराम महाराजांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून दिली. शिवभक्त आणि नागरिकांनीही महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. तसेच स्वराज्याच्या इतिहासाची आठवण ठेवत राजाराम महाराजांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.