पुणे : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील कामगारांचा संताप अखेर रस्त्यावर उसळला. तब्बल २४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी पुण्यात भव्य आणि आक्रमक मोर्चा काढण्यात आला. चर्तुःश्रृंगी मंदिर येथून दुपारी १२ वाजता सुरू झालेला हा मोर्चा थेट शेती महामंडळाच्या कार्यालयावर धडकला.

या मोर्चात १४ मळ्यांवरील सुमारे ९ हजार कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी, रोजंदार कामगार, राजीनामा दिलेले कर्मचारी आणि मृत कामगारांचे वारस मोठ्या संख्येने सहभागी झाले. “हक्क द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू!” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

कामगारांच्या मागण्या मात्र तितक्याच मूलभूत — प्रत्येकाला २ गुंठे जागा देऊन घर, ४था, ५वा आणि ६वा वेतन आयोगानुसार थकबाकी, सेवाउपदान, समान कामास समान वेतन आणि रिट्रेचमेंट कॉम्पेन्सेशन. पण या मागण्या फक्त कागदावरच राहिल्या असल्याचा आरोप कामगारांनी केला.

विशेष म्हणजे, २००२ साली माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांच्या शिफारशीप्रमाणे आणि उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कामगारांना घरे देण्याचे मान्य झाले होते. मात्र, २४ वर्ष उलटूनही अंमलबजावणीचा मागमूस नाही—यावर कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

त्यातच १५ सप्टेंबर २००९ च्या शासन निर्णयानुसार सुमारे ८१ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी अजूनही प्रलंबित आहे. औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांच्या निर्णयांवर सरकारकडून वारंवार उच्च न्यायालयात अपील केल्याने कामगारांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रारही पुढे आली.

आंदोलनात शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेना नेते रघुनाथ कुचिक यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

“देवा भाऊ, बहिणींना पावणार कधी? कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान नाही, कारण त्यांचे हक्कच मिळालेले नाहीत,” असा थेट सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. सरकारने आता विलंब न करता निर्णय घ्यावा, अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र होईल.”

दरम्यान, गेली २५-३० वर्षे कामगार संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहेत. २९ सप्टेंबर २०२४ रोजी तडजोडीचा प्रस्तावही शासनाला देण्यात आला होता. मात्र, १८ महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कामगारांचा संताप आणखी भडकला आहे.

मोर्चाच्या माध्यमातून कामगारांनी एकजूट दाखवत स्पष्ट संदेश दिला —
“आता फक्त आश्वासन नको, हक्क हवेत… आणि तेही तात्काळ!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *