पुणे : स्त्रीशक्तीचा जागर जागवणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त येथील कस्तुरबा मातृ मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांची रंगतदार मेजवानी साकारण्यात येत आहे. ज्ञान, कौशल्य आणि प्रेरणेचा संगम साधणाऱ्या या उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल येथे अॅड. सौ. अश्विनी सचिन जगताप यांचे ‘मन जिंकलं तर जग जिंकता येतं’ या प्रेरणादायी विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा देणारे हे व्याख्यान महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षिका अलकाताई शंकरराव साळुंके राहणार असून, आहारतज्ज्ञ शोभाताई इंदाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभही उत्साहात पार पडणार आहे.
या उपक्रमांच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, दि. २० मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत त्याच ठिकाणी गुणदर्शन, निबंध व पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धांमुळे सहभागी महिलांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येत आहे.
उरुळी कांचन व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कस्तुरबा मातृ मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी, उपाध्यक्षा सुशिला मेटे, सचिव संगिता भालके, खजिनदार जयश्री बेदरे तसेच सदस्य रेश्मा कुलकर्णी, प्रिया बलदोटा, छाया नहार, मिनल फुलफगर, राजश्री शितोळे, स्वाती चौधरी, आशा कांचन आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.