पुणे : हवेली तालुक्यात दिव्यांग समावेशित शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शिक्षकांनी जबाबदारी टाळू नये, असा ठाम संदेश देणारी कार्यशाळा नुकतीच पार पडली.

“शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या माध्यमातूनच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडू शकतो. समावेशित शिक्षण ही केवळ संकल्पना नसून काळाची गरज आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केले.

हवेली तालुक्यातील तब्बल १४५ मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आयोजित सक्षमीकरण कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या वेळी उपसभापती विद्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी निलेश धानापुणे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपसभापती विद्या गायकवाड यांनी थेट इशारा देत स्पष्ट केले, “कोणत्याही दिव्यांग मुलाला शाळेत प्रवेश नाकारू नका. अशा शाळांवर कडक लक्ष ठेवले जाईल.” त्यांनी शिक्षकांना सुनावत सांगितले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना समानतेने शिक्षण देणे ही केवळ जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे. त्यांच्या आत्मविश्वासासाठी शिक्षकांनी पालकांशी सातत्याने समन्वय ठेवावा, असेही त्यांनी बजावले.

कार्यशाळेत दिव्यांगत्वाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अध्ययन अक्षमता, समावेशित शिक्षणाचे महत्त्व, तसेच शासनाच्या सवलती व सुविधा याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. “दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात टिकवणे आणि त्यांना योग्य शिक्षण देणे हीच खरी परीक्षा आहे,” असा सूर संपूर्ण कार्यशाळेत उमटला.

विशेष म्हणजे, कायद्यानुसार असलेल्या २१ दिव्यांग प्रवर्गांची सविस्तर माहिती देत शिक्षकांना सजग करण्यात आले. तसेच आनंददायी शिक्षण पद्धती आणि विविध सवलतींचा प्रभावी वापर कसा करावा यावरही भर देण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी स्पष्ट केले की, “तालुक्यातील शिक्षक गुणवत्ता वाढवण्यासाठी एकजुटीने काम करत आहेत. विशेष शिक्षकांच्या मदतीने ही चळवळ अधिक बळकट होईल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले, तर आभार निलेश धानापुणे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अनेक विशेष शिक्षकांनी परिश्रम घेतले.

एकूणच, हवेली तालुक्यात समावेशित शिक्षणाचा मुद्दा केवळ चर्चेपुरता न राहता आता कृतीत उतरवण्याची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत या कार्यशाळेतून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *