पुणे, भोसरी (दिघी) : जीवनामध्ये प्रत्येकाने समाजऋण फेडण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा, अडचणीत असलेल्या व्यक्तींना सहकार्याची भावना ठेवावी आणि गुणीजनांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी केले.

श्री विष्णू नामदेव पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान, भोसरी-दिघी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. भोळे यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान, उरुळी कांचन व डॉ. रवींद्र भोळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विष्णू पाटील यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

डॉ. भोळे पुढे म्हणाले, “पुण्यासारख्या प्रगत शहरात देशाच्या विविध भागांतून लोक उपजीविकेसाठी येतात. अनेकांनी मोठी प्रगती साधली, तरीही काहींनी आपले ‘गावपण’ जपले आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावे.”

विदर्भातील कुंडा या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत शेती करत कुटुंबाचा सांभाळ करताना विष्णू पाटील यांनी मुलांवर संस्कार घडवले. आज ते श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थानचे सेवक म्हणून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्तीरसाचा प्रसार करत आहेत. ग्रामीण भागातून पुण्यात स्थायिक होऊनही त्यांनी समाजऋण फेडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, असेही गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष अमोल विष्णू पाटील, नितीन विष्णू पाटील, डॉ. अण्णासाहेब पाटील, नितीन बोंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *