पुणे : तरडे ते शिंदवणे या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर वाढत्या अपघातांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी आता तीव्र झाली आहे.

बी.पी.सी.एल. तरडे येथील व्यवस्थापक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असा दबाव वाढत आहे.

हवेली पंचायत समिती सदस्य तसेच हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “या रस्त्यावरून दिवस-रात्र पेट्रोल व डिझेल टँकरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. हे पदार्थ अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे, विशेषतः रात्रीच्या अंधारात मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादा गंभीर अपघात घडण्याआधीच प्रशासनाने जागे व्हावे,” असा संतप्त सूर त्यांनी लावला.

विशेषतः बी.पी.सी.एल. डिपो परिसर ते शिंदवणे या भागात अंधाराचे साम्राज्य असल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर तातडीने स्ट्रीट लाईट बसवून लाईट पोल उभारावेत, अशी ठाम मागणी देखील करण्यात आली आहे.

या बैठकीला चारही गावांचे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, केवळ चर्चा नको, तर प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

दरम्यान, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न लावता ठोस पावले उचलावीत, अन्यथा स्थानिक पातळीवर तीव्र आंदोलन उभे राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *