कान्हे (मावळ) : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी CIE ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेडच्या स्टॅम्पिंग्स विभागात कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेना यांच्यात तीन वर्षांचा अकरावा वेतन करार यशस्वीपणे पार पडला. या करारामुळे एकूण १२७ कामगारांना लाभ होणार असून औद्योगिक क्षेत्रात या कराराची विशेष दखल घेतली जात आहे.

हा करार १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२८ या कालावधीसाठी लागू असून कामगारांना एकूण ₹१५,५०० इतकी वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. करार लागू झालेल्या तारखेपासून सर्व आर्थिक फरक देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

करारानुसार, मागील करारातील कॅज्युअल लीव्ह रजा रोखीकरण वगळता इतर सर्व सुविधा पूर्ववत ठेवण्यात आल्या आहेत. दीर्घ सेवा पुरस्कारासाठीची पात्रता २५ वर्षांवरून २० वर्षे करण्यात आली असून पुरस्काराची रक्कम ₹४,००० वरून ₹६,००० करण्यात आली आहे. तसेच कामगारांना दोन इन्क्रिमेंट देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय “मृत्यू अनुदान निधी” अंतर्गत कोणत्याही कर्मचारी किंवा कायम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास सर्व कर्मचारी व कायम कामगारांच्या एक दिवसाच्या ग्रॉस पगाराइतकी रक्कम आणि त्याच्याइतकीच कंपनीकडून भर घालून संबंधित कर्मचाऱ्याच्या कायदेशीर वारसांना देण्यात येणार आहे. प्रत्येक तीन वर्षांत एकदा कंपनी लोगो असलेले जॅकेट देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

या करार प्रक्रियेत भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस तथा शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

कराराचा स्वाक्षरी सोहळा भोसरी येथील CIE इंडिया मॅग्नेट डिव्हिजनमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून लालमणी शुक्ला (सीओओ – स्टॅम्पिंग), विनायक कडसकर (एचआर हेड – CIE इंडिया ऑपरेशन्स), सौरभ अग्रवाल (ग्रुप प्लांट हेड – स्टॅम्पिंग), विशाल मालुसरे (प्लांट हेड – स्टॅम्पिंग, कान्हे), रविंद्र वैद्य (जीएम – एचआर व आयआर) आणि सागर एन. पवार (हेड – एचआर व आयआर, स्टॅम्पिंग – कान्हे) उपस्थित होते.

कामगार सेनेच्या वतीने अध्यक्ष अरविंद सावंत, अजितदादा साळवी, डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यासह स्थानिक युनिटचे पदाधिकारी रामदास सातकर (अध्यक्ष), अजय सातकर (सरचिटणीस), तुषार सातकर (उपाध्यक्ष), राजेश शेळके (खजिनदार) आणि सागर यादव (जॉइंट सरचिटणीस) उपस्थित होते.
या ऐतिहासिक करारामुळे कामगारांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या या कराराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *