पुणे : थेऊर परिसरात श्री स्वामी समर्थ प्रगटदिन अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि आनंदमय वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक फुलांची सजावट आणि मंदिर परिसरातील विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता.
प्रगटदिनाच्या निमित्ताने सकाळी आठ वाजता श्रींचा अभिषेक विधी संपन्न झाला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ याग विधी पार पडला. दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. भक्तांच्या उपस्थितीत वातावरण भक्तिमय झाले होते.

दुपारी दोन ते पाच या वेळेत श्री विठ्ठल प्रसाद भजनी मंडळ (थेऊरफाटा, धुमाळमळा) तसेच श्री चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळ, थेऊर यांच्या वतीने सुमधुर भजनसेवा सादर करण्यात आली. भजनांच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला.

सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत श्रींच्या पादुकांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. जय भवानी तरुण मंडळ, जाधववस्ती यांच्या ढोलपथकाच्या गजरात ही पालखी सोहळा पार पडला. ढोल-ताशांच्या निनादात गावभर भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.

सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. या सोहळ्यास सुमारे १५०० भक्तांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.

या प्रसंगी चेअरमन तात्यासाहेब काळे, ह.भ.प. विश्वनाथ महाराज तांबे, लक्ष्मण बापू शितोळे, विलास बापू कुंजीर, विठ्ठल नाना काळे, एकनाथ आप्पा काळे, शहाजी जाधव, सरोदे मामा, विजय काळे, उमेश विद्वांस, सुजित काळे, गणेश काळे, अक्षय बधे, संतोष गोगावले, आकाश बधे, अभिषेक शितोळे, नंदूशेठ अविनाशे, तुषार काळे, स्वप्नील कोतवाल, दिलीप आहेर, दादा घोयगुडे, संजय सोनवणे, अरुण वायसे, नितीन शितोळे, लालशेठ गुप्ता तसेच सोसायटीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन चिंतामणी गृह निर्माण सोसायटी व श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, थेऊर यांच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. आनंद महाराज तांबे यांनी देणगीदार व सेवा करणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *