संभाजी पुरीगोसवी, प्रतिनिधी (सातारा जिल्हा)
सातारा : ऐतिहासिक ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिस प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनासह तत्काळ बदलीची जोरदार मागणी लावून धरली आहे.

या घटनेनंतर काही दिवस तुषार दोशी रजेवर गेले असले तरी राजकीय वर्तुळात त्यांच्या बदलीच्या हालचाली वेगाने सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. विधानपरिषदेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले असून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाबाबत आदेश दिल्याने प्रकरण अधिकच तापले आहे. निवडणुकीतील गदारोळ, मंत्र्यांवरील धक्काबुक्की आणि पोलिस बंदोबस्तातील कथित अपयश या सर्व बाबींचा ठपका पोलिस प्रशासनावर ठेवला जात आहे.
शिवसेना नेत्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे अहवाल सादर करत कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सातारकरांमध्येही नाराजी वाढताना दिसत असून “मंत्रीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सध्याच्या घडामोडींमध्ये नंदकुमार ठाकूर यांचे नाव पुढील पोलिस अधीक्षक म्हणून चर्चेत आले आहे. त्यामुळे तुषार दोशी यांची बदली होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
साताऱ्यातील राजकीय वातावरण अजूनही तापलेले असून प्रशासनावर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढत चालला आहे.