पुणे : हवेली तालुक्यातील पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे अखेर प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गावागावातील वाड्या-वस्त्यांवर पाणी उपलब्ध असूनही अनेक हातपंप बंद अवस्थेत पडून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांना अनावश्यक हाल सहन करावे लागत असून प्रशासनाने यापुढे ही निष्क्रियता सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे, सभापती पंचायत समिती हवेली यांनी जाहीर आवाहन करत सर्व ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना सतर्क केले आहे. ज्या गावांमध्ये हातपंप बंद आहेत, अशा सर्व हातपंपांची सविस्तर यादी तात्काळ जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“पाणी असूनही हातपंप बंद ठेवणे ही गंभीर निष्काळजीपणा आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी खेळ केला जात असेल, तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल,” असा कडक इशारा काकडे यांनी दिला आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्राप्त यादीच्या आधारे बंद असलेल्या हातपंपांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. मात्र यासाठी स्थानिक पातळीवरून अचूक माहिती मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिकांनी जबाबदारीने पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवेली तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता नागरिकांनीही पुढाकार घेत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, अन्यथा निष्क्रियतेवर कारवाई अटळ मानली जात आहे.