पुणे : अग्निशस्त्रातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना उरुळी कांचन पोलिसांनी नाशिक येथून अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.

याबाबत उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गु.र. नं. ४१/२०२६, भा.न्या.सं. कलम १०९(१), ३(५), ६१(२) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल आहे.
४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मौजे नायगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथील कबीर चायनिज हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. फिर्यादी मिलींद बाप्पू शेलार (वय ३८) हे हॉटेलमध्ये असताना युनिकॉर्न मोटारसायकलवरून तीन अनोळखी इसम आले. त्यातील एक इसम हॉटेलमध्ये येऊन पाण्याची बाटली मागितली. फिर्यादी बाटली घेण्यासाठी वाकताच त्या इसमाने गावठी पिस्तुलातून गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासासाठी उरुळी कांचन पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली. आरोपी नवनाथ आनंदा घुले (वय २८, रा. दहीटणे, ता. दौंड) याला १३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
अटक आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार संग्राम हरीशचंद्र हुलगे (वय २०, रा. उरुळी कांचन) व सिद्धार्थ गोविंद कांबळे (वय २८, रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) हे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा घडल्यापासून दोघेही फरार होते.
तपास पथकांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नाशिक येथे सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तपासात फिर्यादी व आरोपी सिद्धार्थ कांबळे यांच्यात जुना जमिनीचा वाद असल्याचे समोर आले आहे.
अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर (स्थानिक गुन्हे शाखा) व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे (उरुळी कांचन पोलिस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रवीण कांबळे करीत आहेत.