पुणे : महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात पुणे ग्रामीण पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. एकूण २०० पैकी १४५ गुण मिळवत कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांकाचा मानही त्यांनी मिळविला.
मुंबई येथील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (IPS) यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत पोलीस विभागातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवांचे मूल्यमापन करण्यात आले. डिजिटल प्रणालींचा वापर, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डॅशबोर्ड मॉनिटरिंग आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया या घटकांवर विशेष भर देण्यात आला होता.
पुणे ग्रामीण पोलीस दलाने CCTNS प्रणालीद्वारे FIR नोंदणी, गुन्ह्यांची माहिती, तपास प्रगती आणि आरोपींचा तपशील एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिला आहे. यामुळे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिअल-टाइम डेटा शेअरिंग सुलभ झाले आहे.
‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून १७ विविध सेवा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ‘आपले सरकार ग्रीव्हन्स’ प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा १४ दिवसांत निपटारा करण्यात येत आहे.

ई-ऑफिस (E-File) प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून, प्रकरणांचा जलद निपटारा करण्यात पुणे ग्रामीण पोलीस दलाने आघाडी घेतली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटमुळे नागरिकांना २४x७ तत्काळ माहिती व सेवा मिळत आहेत.
इंटिग्रेटेड डॅशबोर्ड आणि अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून गुन्हेगारी आकडेवारी व विविध सेवा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. GIS प्रणालीमुळे रात्रगस्तीदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांचे लोकेशन ट्रॅक करणे शक्य झाले असून, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत जवळचे पोलीस ठाणे सहज शोधता येते.

Dial 112 आपत्कालीन सेवेतही जलद प्रतिसाद देण्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष कामगिरी बजावली आहे. “पोलीस पॅड” प्रणालीद्वारे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अचूक मनुष्यबळ नियोजन करण्यात आले. भीमा-कोरेगाव आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासारखे बंदोबस्त यशस्वीरीत्या पार पडले.
याशिवाय, “60 Days” आणि “90 Days” पायलट प्रकल्पांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि सेवा वितरणात गती आणण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे.

या यशाबद्दल पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. “तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम पोलीस प्रशासन उभारणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
पुणे ग्रामीण पोलीस दलाची ही कामगिरी राज्यातील इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *