पुणे : हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र थेऊर येथे आयोजित राज्यस्तरीय ‘अजित कृषी प्रदर्शन’ दि. ८ ते १२ एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडत असून प्रदर्शनाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण तात्या काकडे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाइस चेअरमन किशोरजी उंद्रे, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब मुरकुटे, माजी संचालक मारुती अण्णा कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच थेऊरचे माजी उपसरपंच दत्तात्रय कृष्णाजी कुंजीर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य वस्ताद विठ्ठल नाना काळे व विलास पैलवान कुंजीर, गणेश विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन एकनाथ आप्पा काळे, माजी चेअरमन रमेश आप्पा कुंजीर, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक मंचाचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, रामकृष्ण हरी पतसंस्थेचे संचालक दत्तात्रेय तांबे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रसाळ, सोमनाथ चव्हाण तसेच यशवंतचे संचालक मोरेश्वर काळे, गोरक्षनाथ काळे, गोपीचंद काळे, विशाल काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उद्घाटनावेळी ज्येष्ठ नेते हिरामण काकडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने आयोजित हे महाराष्ट्रातील पहिले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन असून थेऊर येथे होत असल्याचा अभिमान आहे. विविध कंपन्या, हजारो शेतकरी व ग्राहक एकाच छताखाली येत असून सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदर्शनाचे आयोजक पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी सांगितले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी शेवटपर्यंत शेतकरी व राज्यहिताचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व प्रत्यक्ष अनुभव यांचा लाभ शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदर्शनासाठी आतापर्यंत सर्व स्टॉलचे बुकिंग पूर्ण झाले असून अजूनही नोंदणी सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योजक व संस्था सहभाग घेत आहेत. प्रदर्शनात आधुनिक लागवड पद्धती, सुधारित बियाणे, ठिबक व तुषार सिंचन, सेंद्रिय शेती, कीड-रोग व्यवस्थापन, शेती यंत्रसामग्री, पशुपालन, मत्स्यपालन व कृषी प्रक्रिया उद्योग यांची माहिती दिली जात आहे.
याशिवाय तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, प्रात्यक्षिके व चित्रफितींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. घरगुती शेती उपाय, सेंद्रिय कीड नियंत्रण व खत व्यवस्थापन यावरही मार्गदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळून शेतीतील खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचे मार्ग समजणार असल्याने जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.