पुणे : पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल मागील कै. मोहनराव भिडे उद्यानाच्या नव्या विकासकामांची पाहणी आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी केली. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या पाहणीवेळी सह महापालिका आयुक्त डॉ. अशोक घोरपडे, कार्यकारी अभियंता राहुल साळुंके, उद्यान अधिक्षक संतोषकुमार कांबळे, उप अभियंता (विद्युत) भाग्यश्री चौगुले, प्र. सहाय्यक उद्यान अधिक्षक श्रुती नाझीरकर, कनिष्ठ अभियंता अमोल जगदाळे, पवन कारंडे तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.

या वेळी दिवटे यांनी आगामी अर्थसंकल्पातील तरतुदींच्या अनुषंगाने उद्यानाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने स्थापत्य, बागकाम (हॉर्टिकल्चर) आणि विद्युत विषयक सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सह महापालिका आयुक्त डॉ. घोरपडे यांनी उद्यानातील सुरू असलेल्या कामांचा आढावा सादर केला.
नव्याने विकसित होणाऱ्या उद्यानांमध्ये बांबूचा अधिक वापर करण्याचेही दिवटे यांनी सुचविले. यामध्ये बांबूचे रेलिंग, पॅगोडा आदी संरचना उभारण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सर्व कामे उच्च दर्जाची होण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उर्वरित जमीन संपादनासाठी पाठपुरावा करण्यास सांगत, कै. मोहनराव भिडे उद्यानाचे काम दसरा सणापूर्वी पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्याचे नियोजन करावे, असे आदेश त्यांनी दिले.