पुणे : मानवी वर्तन आणि निर्णय प्रक्रियेत तर्कशुद्ध विचारांचा अभाव असल्यास भीती निर्माण होते आणि त्यातून निष्पाप नागरिकांवर अत्याचार घडतात. विशेषतः महिलांवर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून होणारे अत्याचार चिंताजनक आहेत. हे दुष्टचक्र थांबवणे हे लोकशाही व्यवस्थेतील सरकारचे कर्तव्य असताना राज्य सरकार त्यात अपयशी ठरत असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

पुणे काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुभाष थोरवे, भोला वांजळे, तात्या शिर्के, आबा जगताप, गणेश मोरे, राजेश सुतार, संजय अभंग, सुभाष जेधे, गणेश शिंदे, उदय लेले, नरेश आवटे आदी उपस्थित होते.
तिवारी म्हणाले, की सत्तेत आल्यानंतर राज्यकर्ते लोकांच्या सुरक्षेच्या आणि सामाजिक जबाबदाऱ्यांच्या राजधर्माला तिलांजली देत आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ही परिस्थिती चिंताजनक आहे. जेव्हा नागरिकांचा शासकीय व्यवस्थेवर विश्वास कमी होतो, तेव्हा ते आपल्या अडचणींवर उपाय शोधताना भोंदूगिरीकडे वळतात.

अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रभावी प्रचार-प्रसार आणि अंमलबजावणी करण्यात सरकार उदासीन असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे भोंदू बाबा आणि पाखंडी व्यक्तींचे प्रमाण वाढत असल्याची टीका त्यांनी केली.
तसेच, “राज्यसत्तेच्या प्रभावाचा गैरवापर करून काही भोंदू व्यक्तींना संरक्षण मिळत असल्याचे दिसते. अशा घटनांवर प्रशासनाने वेळेत कारवाई का केली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही प्रकरणांमध्ये माध्यमांनी उघड केलेल्या घटनांचीही योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

तिवारी पुढे म्हणाले, की भक्ती ही अंतर्मनाशी निगडित असते; ती बाह्य दिखाव्याची बाब नाही. लोकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता समस्यांकडे तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. यासाठी शासकीय पातळीवर व्यापक जनजागृती आणि प्रबोधनाची गरज आहे.

महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आगरकर यांसारख्या समाजसुधारकांनी विवेक, समता आणि विज्ञाननिष्ठ विचारांची शिकवण दिली. भारतीय संविधानातही वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद जपण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे समाजातील समस्या श्रद्धेत नसून अंधश्रद्धेत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राची प्रगतिशील ओळख जपण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *