पुणे : मानवाच्या जीवनाला योग्य दिशा देणारे, आत्म्याचे खरे स्वरूप उलगडणारे आणि जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान शिकविणारे भगवद्गीतेचे अमूल्य ज्ञान आजही तितकेच प्रेरणादायी आहे. गीतेत मनुष्याचे कर्म, धर्म, तसेच परमात्मा, सृष्टी, जीव आणि कालचक्र यांचे गूढ रहस्य उलगडले असून, कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आणि समत्वभाव या मार्गांनी जीवन समृद्ध करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर धर्म, नीती, न्याय, विवेक, सद्बुद्धी आणि सत्य यांचा अंगीकार करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो, असे प्रभावी प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी केले. अनीती, अधर्म आणि असत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचा नाश हा अटळ आहे, हे गीतेचे त्रिकालबाधित सत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उरुळी कांचन येथे श्री उरुळी कांचन देवस्थान संस्था, भैरवनाथ सेवा समिती, ग्रामपंचायत तसेच श्रीराम जन्मोत्सव समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहात त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या ओजस्वी भाषणात डॉ. भोळे यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्णांच्या तत्त्वज्ञानाचे पालन केल्यामुळेच पांडवांचा विजय झाला, तर दुष्ट प्रवृत्तीमुळे कौरवांचा पराभव झाला. गीतेचे भक्तिभावाने चिंतन, मनन आणि अध्ययन केल्यास परमानंदाची अनुभूती मिळते आणि जीवनात दिव्यत्व प्रकट होते.
“जिथे धर्म आहे, तिथेच खरा जय असतो; धर्मच मनुष्याचे रक्षण करतो, आणि अधर्माचा नाश निश्चित असतो,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

या प्रसंगी ह.भ.प. तुकाराम कांचन, सुरेश कांचन, पुंडलिक कांचन, रोहित मुरकुटे, नाना कोंडे, प्रमिलाताई तळेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सप्ताहात अक्षय महाराज रोडे, नाना महाराज काळे, नीता महाराज कांचन, सुनिता महाराज कुंजीर, प्रमिला महाराज तळेकर आणि डॉ. रवींद्र भोळे महाराज यांची प्रवचने झाली. तसेच विविध महाराजांच्या कीर्तनांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.

पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला भक्ती, सेवा आणि एकात्मतेची सुंदर किनार लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *