बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी येथे दिनांक ३ रोजी श्रीदत्त उत्सवानिमित्त पारंपरिक ढोल-लेझीम खेळांच्या जल्लोषात ग्रामस्थांनी भक्ती आणि संस्कृतीचा संगम अनुभवला. श्री दत्त सेवा ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावच्या पथकाला त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल तब्बल ३५ हजार रुपयांची देणगी देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्सवाची सुरुवात धार्मिक कार्यक्रमांनी झाली. मंगल स्नान, भजन, आरती आणि पालखी सोहळ्याने वातावरण भक्तिमय झाले होते. त्यानंतर गावोगावच्या ढोल-लेझीम पथकांनी हजेरी लावत पारंपरिक खेळांची अप्रतिम उधळण केली. मिरवडी, दहिटणे, केडगाव, उरुळी कांचन, हडपसर तसेच पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. तालबद्ध ढोलाचा नाद आणि लेझीमच्या लयबद्ध हालचालींनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

विशेषतः सिंगापूर गावच्या पथकाने सादर केलेल्या पारंपरिक ढोल-लेझीम खेळाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या सर्व पथकांना मानधन देऊन सन्मानित करण्यात आले. गावातील पदाधिकारी, तरुण वर्ग आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि एकात्मतेचा आदर्श घालून दिला.
दिनांक ४ रोजी उत्सवानिमित्त ‘नटखट सुंदरा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमालाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली. रंगतदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच खुलली.
हा संपूर्ण उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील ज्येष्ठ नेते, माजी पदाधिकारी, श्री दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, पोलीस प्रशासन, आरती मंडळ, भजनी मंडळ, सेवेकरी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्याबद्दल श्री दत्त सेवा ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
टिळेकरवाडीतील हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकात्मता, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सोहळा ठरला.