बापुराव चौधरी, उपसंपादक
अनुजा कारखेले – देवरे, प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता अधिकच गंभीर वळण घेतले आहे. आधीच फसवणूक, सावकारी आणि भूखंड व्यवहारातील गैरव्यवहारांच्या आरोपांनी चर्चेत असलेल्या या प्रकरणात दोन महत्त्वाच्या महिलांच्या अनुपस्थितीमुळे तपास यंत्रणेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शिर्डी येथील चार एकर भूखंड खरेदी-विक्री व्यवहारातील कथित फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी असलेली कल्पना खरात गेल्या तीन दिवसांपासून फरार आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास अक्षरशः अडखळत असल्याचे चित्र आहे.

अशोक खरात यांच्यासह त्यांची पत्नी कल्पना खरात आणि इतरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणातील ‘कळीचा मुद्दा’ म्हणून कल्पना खरात यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र गुन्हा दाखल होताच त्यांनी पोलिसांना चकवा दिल्याने तपास यंत्रणेला त्यांचा शोध घेण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक महत्त्वाच्या धाग्यांचा उलगडा अद्याप झालेला नाही.

दरम्यान, या प्रकरणात नाव समोर आलेल्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पोलिसांनी वारंवार समन्स बजावूनही त्या चौकशीसाठी हजर राहत नसल्याने तपास प्रक्रियेत विलंब होत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाची माहिती मिळण्यास अडथळे निर्माण होत असून प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, कल्पना खरात यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा दावा करण्यात येत आहे. तसेच रूपाली चाकणकर यांनीही चौकशीसाठी हजर राहणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक पातळीवरही खळबळ उडवली असून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.