बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी आयोजित “संघनायक गौरव पुरस्कार २०२६” सोहळा यवत येथे उत्साहात पार पडला. संघनायक न्यूज व दि पीपल वेल्फेअर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मा. आमदार रमेश आप्पा थोरात (दौंड विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रा. सदाशिव कांबळे होते. आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षण क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शिक्षक हा समाजघडणीचा प्रमुख घटक असून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. प्रा. डॉ. सोनवणे यांनी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी बोलताना मा. आमदार रमेश आप्पा थोरात यांनी ग्रामीण भागातील शिक्षण उन्नतीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असून प्रा. डॉ. सोनवणे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुरस्कार स्वीकृत करताना प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी हा सन्मान सहकारी, विद्यार्थी व कुटुंबीयांना समर्पित करत भविष्यातही शिक्षण क्षेत्रात अधिक समर्पितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *