बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : मूक नायक मैत्री संघ आणि दि पिपल्स वेलफेयर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, ३ एप्रिल १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकाच्या ९९ वर्षपूर्ती शताब्दी निमित्त तसेच ‘संघ नायक न्यूज’च्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा – २०२६’ नुकताच उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात उरुळी कांचन येथील साने संगीत लोक कलामंचचे संस्थापक शिवराज ज्ञानोबा साने यांना ‘संघ नायक पुरस्कार – २०२६’ आदर्श कला शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला मुख्य आयोजक पत्रकार सदाशिव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार एम. जी. शेलार, वीर गोविंद गोपाळ महार यांचे वंशज पांडुरंग गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलाब चौधरी, महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले, आबासाहेब चव्हाण, संदीप बडेकर, बाबासाहेब बेडेकर आदी मान्यवरांचा समावेश होता.
प्रास्ताविकात पत्रकार सदाशिव कांबळे यांनी ‘संघ नायक’च्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन सुरळीत पार पडले. आभार प्रदर्शन पत्रकार अनिल गायकवाड यांनी केले.
पुरस्कार स्विकारताना शिवराज साने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. माझ्या यशामध्ये आई-वडील, गुरुजन आणि असंख्य मित्रमंडळींचा मोठा वाटा आहे,” असे त्यांनी नमूद केले.