बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : बाणेर–पाषाण लिंक रोड येथे नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे परिसरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने औंध क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त समन्वय बैठक पार पडली.

या बैठकीस औंध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी जतिन कोटे, माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल कोकाटे, स्थानिक नागरिक तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात उद्भवलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे, पादचारी सुरक्षितता आणि वाहतूक नियंत्रण यांसारख्या मुद्द्यांवर सर्वंकष आढावा घेण्यात आला. नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय पुढीलप्रमाणे :
महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग आणि पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह परिसराची संयुक्त पाहणी या आठवड्यात करण्यात येणार
पाहणी अहवालाच्या आधारे सविस्तर मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार
एप्रिल अखेर हा आराखडा सर्व संबंधितांसमोर सादर केला जाणार
त्यानंतर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीसाठी कार्ययोजना निश्चित केली जाणार

यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “समस्या निर्माण झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा पूर्वनियोजनावर भर देणे आवश्यक आहे. पासपोर्ट सेवा केंद्र ही नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा असली तरी त्याचा परिसरातील वाहतूक व नागरी व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *