बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : राज्यातील महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट तब्बल २५ दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. ७/१२ उतारा आणि ८अ ही अत्यावश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने पीककर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी, खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत ढकलला जात असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ आडागळे यांनी याबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आहे. “वेबसाईट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बँका ७/१२ आणि ८अ शिवाय कर्ज मंजूर करत नाहीत, त्यामुळे कर्जवाटप प्रक्रिया पूर्णपणे खोळंबली आहे,” असे ते म्हणाले.

सध्या खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून बियाणे, खते आणि कीटकनाशकांसाठी शेतकऱ्यांना तातडीने भांडवलाची गरज आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे बँका अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळीत झाले असून काहींना खासगी सावकारांकडे वळण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असली तरी “वेबसाईट बंद आहे” हेच एकमेव उत्तर दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, ही बाब अधिकच चिंताजनक ठरत आहे.

“वेळेवर कर्ज मिळाले नाही, तर शेतीची मशागत कशी करायची?” असा सवाल संतप्त शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने वेबसाईट सुरू करून पर्यायी उपाययोजना जाहीर कराव्यात, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सने दिला आहे.

यावेळी रिपब्लिकन प्रेसिडेंट पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण भाऊ बडेकर, डॉ. आण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स (ABS) चे राजाभाऊ आडागळे (पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष) आणि सचिनभाऊ साठे (राष्ट्रीय अध्यक्ष) यांनीही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा याचे तीव्र परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *