बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : वाढदिवस म्हटला की केक, पार्टी आणि जल्लोष यांचीच आठवण येते. मात्र या पारंपरिक चौकटीला छेद देत सोरतापवाडी येथील युवा नेतृत्व कु. सुरज उर्फ सनीशेठ पोपटराव चौधरी यांनी सामाजिक जाणिवेचा सुंदर आदर्श घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटून घेत एक वेगळा संदेश समाजासमोर ठेवला.

साधेपणाला साजेसा आणि माणुसकीचा स्पर्श असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. वाढदिवसानिमित्त सनी चौधरी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटे, केळी आणि चॉकलेटचे वाटप केले. या छोट्याशा कृतीतून मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि डोळ्यांतील चमक हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. शाळेच्या परिसरात या निमित्ताने उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

सोरतापवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. अशा विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांच्या आयुष्यात आनंदाची छोटीशी भर घालणे, हीच खरी समाधानाची अनुभूती असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले. “हीच मुले उद्या मोठी होऊन समाजात आपले स्थान निर्माण करतील,” असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

सनी चौधरी हे रॉयल ग्रुप फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष तसेच हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. यापूर्वीही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिवनेरी किल्ल्याची सहल, वह्या व शालेय साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

“हॉटेलमध्ये किंवा दिखाऊ पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मुलांसोबत तो साजरा करण्यात खरा आनंद मिळतो. ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो, त्या शाळेतच हा दिवस साजरा करणे ही माझ्यासाठी विशेष भावना आहे,” असे मत सनी चौधरी यांनी व्यक्त केले.

तसेच वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
या प्रेरणादायी उपक्रमास उपसरपंच रविंद्र गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अशोकराज चौधरी, किरण मानमोडे, संजय चौधरी, राजेंद्र चौधरी, प्रतीक चौधरी, ऋषिकेश वाल्हेकर, सुरज चौधरी, प्रणव चौधरी, तुषार म्हस्के तसेच शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *